नजरेआडची डाकीण ...

नजरेआडची डाकीण



(आदिवासी समाजात आजही काही स्त्री पुरुषांवर चेटकीण, डाकीण असल्याचा संशय घेऊन त्यांना मारहाण करणे, सामाजिक बहिष्कार टाकणे, डाकिनी समाजाला घटक आहेत, अश्या श्रद्धा- अंधश्रद्धामुळे डाकीण पेक्षा जास्त शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या भगताकडून त्यांच्यावर अघोरी आणि क्रूर उपाय केले जातात. पुरुषही डाकिणी असल्याचा संशय असला तरी सामाजिक अवहेलनेच्या बळी मात्र बहुसंख्य स्त्रियाच ठरत असतात. डाकिणी असलेल्या स्त्रिया गुप्त विद्या प्राप्त करून समाजातील मुलं-बाळांना, स्त्री पुरुषांना ठार मारतात, त्या रक्तपिपासू असतात , असा गैरसमज समाजात आहे .त्याचबरोबर समाजविघातक डाकिणीची विधायक प्रतिविद्या भगताला अवगत असते, त्यामुळेच भगत शारीरिक व मानसिक रुग्णावरील डाकिणीची बाधा दूर करतो. म्हणूनच आरोग्य देणाऱ्या भागातला सन्मान आणि समाजाला पीडा देणाऱ्या डाकिणीचा छळ केला जातो. आजही अश्या अनेक घटना बघायला मिळतात. नंदुरबार जिल्ह्यातील मांडवी खुर्द गावात कैलीबाई पटले या आदिवासी स्त्रीला डाकीण ठरवून ठार मारण्यात आले आहे. तर अक्कलकुवा तालुक्यातील वेरी ह्या गावाततुन वेगवेगळ्या घटनांमध्ये डाकिणी प्रथेच्या अनुषंगाने काही व्यक्तीचा मृत्यू झाला. तर याच तालुक्यातील उमरकुवा येतील महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती. कुंभारपाडा या गावात डाकीण ठरवलेल्या गेलेल्या एका आदिवासी स्त्रीला मिठाला हात लावण्यास सांगण्यात आले होते. ( जे आदिवासी समूहातील दिव्य समजले जाते) . अश्या कितीतरी समाजविघातक घटना आजही पाहायला मिळतात.)


 


 


" काल अमावास्या ...ऐरवी रात्री बारा एक पर्यंत जागे राहून गप्पांमध्ये रंगणारा गाव आज नऊ वाजताच शांत झाला होता .. लहान मुलांना जेवून केव्हाच झोपवून ठेवलं होत. म्हातारी माणसे देवाचा जप करत आपल्या आपल्या अंथरुणात पेंगुळली होते. रातकिड्यांचा कर्कश आवाज वातावरणात घुमत होता. बारा चा ठोका जसजसा जवळ येत होता तशी तशी रात्र अजूनच गडद होत होती. गावाच्या वसणीवर चिंचेच्या झाडावर बसलेलं घुबड...अत्यंत भेदक व भेसूर डोळे. मधातच काळ्या मांजरीचा आवाज....काळ्या कुट्ट अंधारात चमकणारे तिचे हिरवे डोळे...गावातली मोकाट कुत्रे एकत्र येऊन भेसूर रडत होती.


बाराचा ठोका पडला. तशी ती आली....मोकळे सोडलेले लांबसडक केस, माथ्यावर लालभडक कुंकू, एका हातात भलं मोठं आरतीचं ताट, त्यात कुंकू, फुल, लिंबू मिरची. काळी बाहुली, आणि दुसऱ्या हातात मानवी कवटी....रक्त पिऊन लाल रंगलेले मोठे दात,,,त्या रक्ताचे ओघळ तिच्या सगळ्या अंगावरून सांडलेले.....तिच्या रक्ताळलेले पायाचे ठसे ..ते पण उलटे!!....ती...डाकीण....गावाबाहेरच्या नदीवर दर अमावस्येच्या रात्री अंघोळ करते..तिला अजून अघोरी विद्या प्राप्त करायच्या आहे ..त्यासाठी ती नरबळी शोधत असते.. जो कुणी व्यक्ती रात्री बाहेर पडेल त्याच्या मानगुटीवर बसून आपल्या सुळ्या दातांनी डाकीण रक्त पिते आणि ती बळी कालीमातेला वाहते.. मानवी रक्त पिल्याने डाकीण अधिक शक्तिशाली होते, जर गावातली कुणी व्यक्ती भेटली नाही तर अघोरी विद्या संपादन करण्यासाठी स्वतःच्या मुलाबाळांचाही बळी घेतात. अश्या रात्री त्या डाकीण ला कुणी पाहिलं किंवा तिच्या ओल्या केसांचं पाणी अंगावर पडलं तर ती व्यक्ती दीर्घ आजरी पडते नाहीतर वेडी होते. रक्ताच्या उलट्या करते..पूर्ण अंग काळ निळं पडून मरण पावते,..अश्या भयानक डाकिणीपासून वाचण्यासाठी गावातलं कुणीच अमावस्येला घराबाहेर पडलं नाही..म्हणून त्या डाकिणीने एका टिटवी आणि कुत्र्याचा बळी दिला..त्यांच्या रक्तानी कालीमातेला अभिषेक घातला आणि बाकी रक्त स्वतः पिऊन घेतलं..आणि पूजा करून निघून गेली.."


 


हे सगळं दुसऱ्या दिवशी गावाच्या मध्यभागी असलेल्या वडाखाली बसून भगत सांगत होता. त्यांच्या बाजूला बसलेले दहा पंधरा जण जीव मुठीत घेऊन रात्रीचा प्रसंग ऐकत होते...'बरं झालं आपण बाहेर पडलो नाही " असं म्हणून मनातल्या मनात देवाचे आभार मानत होते..गावचा सरपंच आणि त्याचा मित्र पंकज भगताजवळच बसले होते. भगताची गोष्ट ऐकून सरपंचानी भगताला विचारलं..



" तुमाले कसं ठाव हे? तुमि घराबाहीर आले व्हते कि काय?"



" मी घरी बसून माया दिव्य दृष्टीनं पायल...मी समद्या गावाले माया अभिमिश्रित अंगार्यान बांधून ठुलं व्हतं म्हणून ते डाकीण कैच करू शकली नाय...नाईतर ते डाकीण समद्या गावाले वश कराच्या इराद्यात हाय....पण मायासमोर तिची शक्ती कमी पडून र्ह्यायलीं म्हून आपल्या गावाले धोका नायी." -भगत.



"बरं झालं भगत तुमि हाय...आता तुमीच आमचे रखवाले" असं म्हणून सरपंचाने भगताचे पाय धरले...हे पाहून पंकज सोबत तिथं बसलेल्या सगळ्यांनीच भगताचे पाय धरले..हात जोडून पंकज नि भगताला विचारलं.



" देवा भगत ...कोण हाय ती डाकीण...आता मांगच त तुमि एका डाकिणीपासून गावाले मुक्त केलं व्हतं..आता अजून कोणाची काली नजर लागली आपल्या गावाले.."



"माका नाव न्हय सांगणार तीच...तीच नाव कुणीच घिवू नका...ती गेली . त्याच मागच्या डाकिनीच्या घरी...मी तिले तिथं माया मंत्रान बांधून ठेवणं..म्हंजी ते गावात येणार न्हय."- भगत



"हवं देवा...तुम्ही सांगान तस..कोण अस्त्तिया ती ?"- गर्दी आता बोलू लागली...



" गावाच्या काठान घर असत्या तीच...मागच्या दहा दिसात नवरा खाल्ला तिनं. आन गायब झाली...आता गाव खायला उठली ती अवदसा..."- भगत


बसलेले सगळे घाबरले..विचारात पडले..गाव जास्त मोठं नव्हतं त्यामुळे गावात मेलेल्यांची आणि जन्मलेल्यांची माहिती सगळ्यांना असायची.. मागच्या दहा दिवसात पांडुरंग मेला होता. तस त्याचा आकस्मित मृत्य झाला होता. कुठला आजार नाही ना कुठला त्रास नाही...एक दिवस अचानक विषबाधा झाली आणि मेला. लग्नाला फक्त वर्ष झालं होतं .. त्याची बायको मंदा!!!! नदीवरून पाणी आणायला म्हणून गेली ती परत आलीच नाही ...शोधाशोध झाली..पण पत्ता लागला नाही...म्हणजे मंदा डाकीण होती!!!


" मले तवाच वाटलं व्हतं..तिच्यात कायितरी गडबड हाय...असा कसा पांडुरंग मेला..एवढा तरणा पोरगा..तिचंच काहीतरी लफडं असं म्हून नवऱ्याला मारलं...पक्क्यात तेच डाकि......" भीतीने विनायक ला पुढचं वाक्य बोलावल्या गेलं नाही...' राम राम म्हणत त्याने तोंडात दुपट्टा कोंबला..


 


विनायक च्या बोलण्याला भगताने खुणेनेच होकार भरला. जमलेल्या सगळ्यांना विश्वास बसला कि मंदाच डाकीण आहे.. लग्नाच्या एकाच वर्षात कुठलाही आजार नसताना , कुठलाही अपघात न होता तिचा नवरा मेला होता..त्यानंतर तीच अचानक गायब होणं हि कारणं तीला डाकीण ठरवण्यासाठी पुरेशी होती . हाहा म्हणता हि बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली..गावात पुन्हा एका नवीन डाकिणीने जन्म घेतला होता..


 


सरपंचाने गावात दवंडी पिटवली कि;
'कोणत्याच अमावस्येला गावातली लहान-मोठी, बायका पोरं,,,म्हातारी माणसं काहीही झालं तरी घराबाहेर पडणार नाही..अगदी कुणी मेलं तरीसुद्धा नाही"



मंदाच्या डाकीण होण्यामुळे गावात भीतीच वातावरण पसरलं....मंदाच्या घराशेजारच्या मंगलाचा ७-८ वर्षाचा मुलगा सतत आजारी राहायचा..मंगलाने त्याच खापर मंदावर फोडलं..



"आव माय मायें...तेच चेटकीण हाय ..तिचं करणी केली आसनं माह्या लेकराले..म्हून तर मे कोकरू बिमार पडते व.." असं म्हणून मंगलाने गळा काढला..बाकी बाया तिला शांत करत तिच्या बोलण्याचं समर्थन करत होत्या, त्यातल्या एका वयस्कर बाईने तिला समजावलं..


" आव मंगले..गप बस कि..असं तीच नाव घिवू नको..असं तेच ते बोलणार्याले हातातली बावली बनोते आन खेळोते ते.. "


हे ऐकल्याबरोबर सगळ्यांनी विषय बंद केला.. मंदाच्या गायब होण्यापेक्षा मंदा डाकीण असण्याच्या चर्चेने जोर पकडला होता....एक एक दिवस मागे पडून अमावस्या जवळ येत होती..तशी सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढत होती...काही मोजके लोक होते ज्यांना हे खरं कि खोटं हे पडताळून पाहायचं होतं..पण काहींची हिंमत होतं नव्हती तर बाकीच्यांना त्यांच्या घरच्यांनी गप्प बसवलं...त्यामुळे सगळं गाव येणाऱ्या अमावस्येपर्यंत डाकिनीच्या दहशतीखाली गेलं!!!


पंधरवाडा संपला.....अमावस्या आली...आकाशात काळे ढग जमा झाले होते..गाव केव्हाच झोपी गेलं होतं..कुत्री रडत होती....अवसेची किर्रर्रर्रर्र काळीशार रात्र ..जणू अंगावर अंधार पांघरून.. भयाण नीरवतेला भेदणारे घुबडाचे अभद्र्र घुत्कार आणि रातकिड्यांच्या किरकिरण्याची भेसूर संतत गाज…आणि गावाबाहेरच्या त्या पडक्या घरात ती डाकीण...रात्रीचा एक वाजत होता...आजुबाजुंच्या पूर्ण परिसरात फक्त त्या पडक्या घरात एक दिवा टिमटिमत होता...


ते डाकिणच घर..जागोजागी जाळ्यांचा राज्य...मोडक्यातोडक्या वस्तू...एखाद्याला कसतरी जिवंत राहण्यापुरतं मोजकंच साहित्य..तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा किर्रर्र आवाज झाला...त्या आवाजाने रात्रीची शांतता भेदून काढली...तिच्या काळजात धस्स झालं!!!



एकापाठोपाठ एक तीन मानवी आकृत्या त्या पडक्या वाड्यात शिरल्या.....ठप्प ठप्प करत पावलांचा आवाज तिच्याच दिशेने येत होता...क्षणांगणिक हृदयाची धडधड वाढत होती...जीव एकवटून ती मागे मागे सरकत होती..पण तिची ती केविलवाणी हालचाल बघून त्या तीन मानवी आकृत्या अभद्र हसू लागल्या....त्यातली एक आकृती अगदीच तिच्या जवळ आली...येताना ती आकृती टांगलेल्या दिव्याला धडकली तसा तो दिवा इकडे तिकडे झोका घेऊन लागला...तिने मोठ्या कष्ठाने डोळे उघडले....


दिव्याचा अर्ध्या झोक्याला त्या मानवी आकृती चा चेहरा आता स्पष्ट दिसू लागला....तो सरपंच होता!!!! हातात अर्धी संपलेली दारूची बाटली!! तोंडाला खर्याचा वास...आणि चेहऱ्यावर असुरी हास्य....


" ये...उठ.." असं म्हणून त्याने समोर पडलेल्या मंदाला एक जोरदार लाथ मारली..!!


हो!! समोर पडलेली "ती ' मंदाचं होती"


अर्धनग्न , आहेत ते कपडे फाटलेले, अंगावर ठिकठिकाणी मारल्याचे काळे निळे व्रण , विस्कटलेले केस, डोळ्याखाली काली वर्तुळ, तिच्याजवळ पडलेले भाकरीचे तुकडे, एक पेला..आणि अर्धमेली ती !!



"च्या आयला,,,झोपायसाठी आणलं व्हय तुला इथं...हे म्हणजे उलटच झालं कि...सगळी मेहनत आमी करायची आणि तू इथं झोपा काढणार व्हय...!! तू गावात लगीन करून आलीस तवाच आमचा जीव आला तुयावर...पण आमी असच थोडी तुटून पडलो तुयावर?? पयले सगळी प्लॅनिंग केली. मग तुया नवऱ्याले विष देलं...तुले नदीवरून उचलून आणलं.."


दारू जास्त झाल्यामुळे तोल जाऊन सरपंच खाली पडला..त्याला सावरायला मागच्या दोन आकृती समोर आल्या...भगत आणि पंकज....



" आओ संरपंच....जरा दमाणी घ्या कि...आख्खी रात्र आपलीच हाय आता..फकस्त आवाज जरा कमी करा, कुणी भटकला इकडे तं वांदा व्हायचा "- पंकज



तस जोरजोरात हसत भगत म्हटला, " आरे पक्या ...कोण मायचा लाल हाय ..अमावस्येच्या राती भटकणं हिकडे...हि डाकीण नाय का मंदा....हिले डाकीण कायच्या साठी बनोल?? हिच्या नावावर सारा गाव गपगुमान मूग गिळून झोपलाय आपापल्या घरट्यात...हे मंदा ..लेका लय जिद्दी माल हाय....पैलेच आइकल असत तं येवडा मार नसता खाल्ला नं!! जाऊ दे ...मारून मारून ओरबाडण्यात लै मज्जा येते पण..."



आधी सरपंच ...मग भगत आणि नंतर पंकज...एकामागून एक तिघांनी मंदावर आपली वासना शमवली. तिची प्रतिकार करण्याची क्षमता या नराधमांनी केव्हाची संपवून टाकली होती...!! तिला त्या पडक्या घरात आणल्यापासून सतत निघृणपणे मारहाण करण्यात येत होती..तिच्या गुप्तांगावर जखमा केल्या होत्या..जिवंत राहण्यापुरतं जेवण तिला पुरवत होते..हा अमानवी प्रकार पहाटेपर्यंत सुरु होता.. बाकी गाव मात्र नदीवर डाकीण अंघोळ करून पूजा करत असेल म्हणून घरात झोपला होता !!!!!! पहाटे पडक्या घरातून निघताना एक मोठी काळी बाहुली भगताने दरवाज्यात टांगली...!


 


 


.


.


 


तब्बल सहा सात महिने मंदाचा उपभोग घेतल्यानंतर तिघांचा तिच्यावरून जीव उडाला..आता त्यांना नवीन पाखरू हवं होत...तसही मंदा आता शरीराने खंगली होती...


" काय राव...आता जाम कटांला आला या डाकिणीचा!!!! आयो भगत.....जरा नवी कोरी डाकीण तयार करा कि..."- सरपंच'


" आता कस्स..आमच्या मनातलं बोलला सरपंच ..म्या काय म्हणतो आता जरा येगळा हात मारू..नाजूक फुल हाय कि आपल्या गावात एक ... ती हाये ना दिनकरची पोरगी..पदमा....खुडू कि त्या फुलाला ...मस्त फुलली हाय ...जवानी तं कचकचून भरली तिच्यात.."- पंकज


 


" पण हाय त्या डाकिणीच काय कराच ?" - सरपंच



" त्यासाठी मी हाय की ... येणाऱ्या अमावस्येला मी ह्या डाकिनीला रंगेहात पकडतो आन दिवू गावातल्या लोकांच्या हवाली करून...""
असुरी हास्याने ते घर भेदून गेलं!!!


 


पुढच्या अमावस्येनंतर अचानक मंदा गावातल्या वडाच्या पारावर पडलेली सापडली...बाजूला भगत बसलेला होता..गर्दी तुंगली..बायका पोर..सगळी जमली..तोंडात मंत्रांचा जप करून भगत तिच्यावर अंगारा फुंकत होता...त्याच्या अंगात वारे येऊन तो घुमू लागला..डाकीण ला कैद केलं म्हणून सारा गाव भगताचा उदोउदो करत होता...



"कुलकशीनी..माया गावाले खायला खायला उठली होतीस..पाय मी आता तुये काय हाल करतो?" असं म्हणून भगताने तिला एरंडीच्या काठीने मारायला सुरवात केली.. तिच्या घशात कोळसे घालण्यात आले..जेणेकरून तिला काही बोलताच येणार नाही..


"हिला असंच पायजे ..." असा आवाज गर्दीतून येऊ लागला...


त्यानंतर तिच्या चेहऱ्याला काळे फासून, गाढवावर बसून तिची धिंड काढण्यात आली..त्यानंतर तिला गर्दीच्या मधोमध ठेवून तिच्यावर दगडाचा मारा करण्यात आला...आपल्या हाताने मंदा मार वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली...काहीवेळाने तिची हालचाल थांबली..आणि जमावाने तिला गावाबाहेर खोल मातीत पुरून टाकलं...


पाडावर बसून भगत गालातल्या गालात हसत होता... सरपंचाने त्याच्याकडे बघून डोळा मारला!!!
.
.
..
.
.
.


 


 


.
काही दिवसाने पदमा नदीवरून गायब झाली आणि गावात एका नव्या डाकिणीचा जन्म झाला!!!


 


 


देश चंद्रावर पाऊल ठेवत असला तरी अजूनही काही आदिवासी भागात अश्या कुप्रथा आहेत ती मोठी दुःखद बाब आहे..एकीकडे डॉक्टर इंजिनिअर , लेखक, विचारवंत असा वर्ग आहे तर एकीकडे विज्ञान , शिक्षण यापासून वंचित वर्ग अश्या समाजविघातक घटनांचा बळी ठरत आहे. वैज्ञानिक जाणीव, अंधश्रद्धा निर्मूलन , जाणिवांपूर्वक शिक्षण यातून प्रबोधनात्मक वाटचाल होत असली तरी डाकिणीसारखी क्रूर प्रथा अजूनही समाजातून हद्दपार झालेली नाही. यासाठी सर्वंकष जाणिवांनी युक्त समाज निर्माण करणे अत्यावश्यक आहे .अश्या प्रागतिक वाटचालीतून डाकिणीसारख्या क्रूर- अनिष्ट प्रथेचा शेवट करून आदिवासी महिलांची अवहेलना थांबवता येईल अशी आशा करते.


---------समाप्त------------


नाव- तेजल शिला दिलीप अपाले
संपर्क- अचलपूर, जिल्हा - अमरावती, tejalapale@gmail.com