माणुसकीचा आधारवड!
माणुसकीचा आधारवड!

 


 

अंबाजोगाई! अंबाजोगाई म्हणजे- स्वातंत्र्याचं 'तीर्थ'स्थळ !

अंबाजोगाई म्हणजे- मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामींची कर्मभूमी!

शैक्षणिक-सामाजिक चळवळींच केंद्र म्हणजे अंबाजोगाई. सुबक पुरात्वतीय अवशेष उदरात साठवणारं गाव म्हणजे अंबाजोगाई आणि जणुकाही बालाघाटाच्या कुशीत पहुडलेलं बाळसेदार लेकरू म्हणजे अंबाजोगाई!

याच बालाघाटाच्या डोंगरात एक तलाव आहे-'काळवटी'. अंबाजोगाई पासून हाकेच्या अंतरावर. ही गोष्ट या तलावाकाठची.

एकदा दोन मित्र तिथं पोहायला गेलेले. तलावात पोहण्याची सवय नसल्याने तलावाच्या काठाजवळ पोहणे सुरू होते  .तिथंच एका कोप-यात आई-ताईचं धुणंही चालू असतं. या दोन मित्रांनी एका ताईला प्लॅस्टिक ची बादली मागीतली. तिनंही दिली पण , परतीच्या अटीवर. हे दोघे परत निघाले, जाताना बादली वापस करूया म्हणून थोडी शोधाशोध केली. जवळंच एक खोपटी होती. ती मुलगी तिथं 

 

दिसली. हे दोघे तिथं गेले.तिच्या वडिलांनी 'घरात' येण्याचा आग्रह केला.खरंतर घर कसं म्हणावं- एकावर एक दगडं रचून केलेला खिळगा.

झाडांच्या फांद्या म्हणजे बांबू.कसंबसं डोईवर छप्पर तगलेलं.

आजुबाजुला फक्त आणि फक्त आठराविश्व दारिद्र्य पसरलेलं.

ओळख-पाळख झाली. या दोघांपैकी एक डॉक्टर निघाला.

शिकलेली लोकं बघून आईच्या जीवाची तगमग सुरू झाली. तिनं आपल्या लेकीच्या पायाला जखम झाल्याचं सांगितलं.

"तायडे, दावं की, हे बी डाक्टरंच हायीती." लेक थोडी बुजलेली.नको म्हणंत होती. पण नड तर होतीच.

'गरज ही शोधाची जननी', हे पुस्तकी वाक्य. 

'गरज ही हतबलतेचीही आईचं!'

शेवटु संकोच सोडून तिनं जखम दाखवली. जखम कसली- दोन लिंबं मावतील एव्हढी 

 

खोक होती ती! दोघेही हादरून गेले.एव्हढी जखम कशी झाली ?

माय-बाप ऊसतोड मजूर. 

ऊसतोड मजूराचं 

सगळं कुटुंबंच ऊसतोडणीसाठी परमुलुखात जातं. मुकादम जिकडे पाठविल तिकडे निघायचं.हे गेलेले कर्नाटकात. तिथं लेक पडली आजारी.

गरीबांच्या लेकिंनी दुखणी अंगावरंच काढायची असतात, हीच इथली दुर्दैवी रीत. पैकं आणायचं कुठून? पण हे दुखणं वाढंत गेलं. त्यात परमुलूख. शेवटी एक वैदू गाठला. त्यानं बघितल्यासारखं केलं अन् चक्क 'डागणी' दिली! गेले दोन महिने ही लेक या डागणीची जखम सांभाळते,धुणं धुते,

घरकाम करते. 

बरं ही गोष्ट फार जुनी नाही. आटपाट नगरातली तर नाहीच नाही. २०१६ च्या मे महिन्यातली.

डॉक्टरांनी औषधं लिहून दिली. हे दोघे निघाले. 

 

या घटनेनं एकजन अस्वस्थ झाला. आपल्या अवतीभोवतीचं हे दारिद्रय, शिक्षणाचा अभाव,अनारोग्य,

अंधश्रद्धा यांनी मनात चलबिचल सुरू केली. मनाचा संतोष हरवला. 

'केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही, यात उतरूनच काम करावं लागेल.'

ही अस्वस्थता घेऊनच परतलेला माणूस म्हणजे,अँड. संतोष पवार!

केवळ विचार करून चालणारं नव्हतं. कृती महत्वाची. पण नेमकं करायचं काय ? हे समजंत नव्हतं. 

संतोष पवार म्हणजे अंबाजोगाई लगतच्या जोगाईवाडीचे एकेकाळचे सरपंच.

त्यामुळं राजकारणात ऊठबस होतीचं. पण हा नवा विचार सामाजिक क्षेत्रातील. याच काळात ते एकदा पुण्याला गेलेले. एका निवांतवेळी त्यांची भेट झाली-अनाथांची माय-सिंधुताई सपकाळ यांच्याशी. माईंचं काम पाहून,पुन्हा पुन्हा सामाजिक क्षेत्र खुणावत होतं. आता एक वर्ष सरलं होतं. 

एकेदिवशी सकाळीच संतोष पवार निघाले स्व.डॉ.द्वारकादास लोहिया यांच्याकडे. 

बाबुजींजवळ मन उघडं केलं. बाबुजी म्हणजे अंबाजोगाईची  सामाजिक ओळख. अनेक आंदोलनं, आणिबाणी इ. सर्वकाही भोगलेले सच्चे कार्यकर्ते.

आयुष्यभर सामाजिक कार्याचा वसा घेतलेले प्रेरणास्थान!

 "हा रस्ता खडतरच आहे. यापुढे तुला सतत समाजाकडे मागत राहावे लागेल.

तुझा प्रामाणिकपणा हाच केवळ तुझा सच्चा. साथीदार असेल." 

हा आशीर्वाद घेऊन 

०१ मे २०१७ पासून सुरू केलेला उपक्रम म्हणजे 

"आधार माणुसकीचा!" 

 

संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेची स्थापना २००१ मध्येच करण्यात आली होती. संस्थेमार्फत हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला.

 

आज हा उपक्रम अनेकांसाठी "आधारवड" ठरतोय. 

बीड ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.नेमका अकडा सांगता येणार नाही पण जवळपास पावणेदोन लाख ऊसतोड कामगार 

इथं असावेत. यातही केवळ १८ वर्षांपुढील व्याक्तीच समाविष्ठ. पण ऊसतोडणी साठी संपूर्ण कुटुंबंच जातं. लेकरं सोबतच असतात. म्हणजे हा अकडा तीन लाखांच्या पलिकडे जातो.एव्हढं अस्थायी स्थलांतर इथून घडतं. सततचा कमी पाऊस वा दुष्काळ ठरलेला. अनेकजन अल्पभूदारक. मग ऊसतोडणी शिवाय पर्याय नाही. त्यातंच स्वतःच्या छोट्या जमिनिच्या तुकड्यावर काहिच पिकलं नाही तर, कर्जबाजारीपणा वाढंत जातो. एक दुष्टचक्र सुरू होते.अनेकदा याची परिणिती आत्महत्येत होते. 

जाणारा जीवानिशी जातोच आणि मागे शिल्लक राहतात ते भकास,उदास चेहरे. 

या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांपर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न 'आधार माणुसकीचा ' करत आहे. 

आजपावेतो अश्या १७५ कुटुबांपर्यंत संतोष पवार पोहंचले आहेत.बीड व लातूर जिल्ह्यातील ही कुटुंबं आहेत.यात काही कुटुंबातील व्यक्ती एचआयव्ही बाधित सुद्धा आहेत. या सर्व

३५० लेकरांच्या शिक्षणासाठी ते सहकार्य करत असतात. 

संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य, लेकरांना शिक्षण,मुलींचे विवाह, वंचितांसाठी शासकीय योजनांची माहिती यासाठी ते सहकार्य

करतात. 

 संस्थेशी जोडलेली डॉक्टर मंडळी अश्या कुटुंबांकडून तपासणी फीस् घेत नाही.

आजपर्यंत १५० आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

 लोकसहभागातून विवाह घडवले जातात.असे तीन विवाह आजपर्यंत करण्यात आलेआहेत.

महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जाते.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. दारिद्र्याचा हा भयावह काळोख ओलांडून जाण्यासाठी शिक्षणंच प्रभावी माध्यम ठरेल.

अश्या चिंताग्रस्त कुटुंबातील पाच लेकी एमबीबीएस ला प्रवेश घेत्या झाल्या. या सर्वांच्या शिक्षणासाठी समाजाकडे दान मागीतले.याशिवाय MS-CIT सारख्या कंम्प्यूटर कोर्ससाठी अनेकांना प्रवेश दिला.

चांगल्या कामापाठी समाज असतोच.हे सर्व कार्य अनेकांनी सहकार्य केले म्हणून संभव झाले.

भविष्यात मुलांसाठी, निवासी वसतिगृह व दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हे ध्येय आहे.

 

कोरोना संकटकाळात ४७५ जीवनावश्यक वस्तूंच्या कीटसचे वितरण करण्यात आले.सुमारे २००० किलो भाजीपाला व फळे यांचेही वितरण करण्यात आले.

 या वस्तुंपेक्षाही, 'संकटकाळी आमच्यासाठी धडपडणारे कोणीतरी आहे', ही भावनाच जगण्याचे बळ देऊन जाते.

अनेक नव्या संस्था,गट जोडले गेले. 

 

कोरोनावर लस वा औषध आपण शोधू शकत नाहीत. शास्त्रज्ञ ते कार्य करीतच आहेत.

पण आपण माणुसकी नक्कीच जिवंत ठेऊ शकतो.

संपूर्ण मानवजातीचे जीवनंच धोक्यात आलेल्या या काळात, मानवतेची अशी बेटं अधिक महत्वाची ठरतात. असे आधारB जगण्याची नवी दिशा देऊन जातात इतरांना व स्वतःला सुद्धा!

 

 

अमृत महाजन,* अंबाजोगाई.

9420014964